प्रियेसीवर प्राणघातक हल्ला करून प्रियकराने सुतळी बॉम्ब स्वतःच्या तोंडात फोडला, दोघेही गंभीर जखमी, मुंबईतल्या मालाडमधील घटना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – एका 55 वर्षीय प्रियकराने आपल्या 58 वर्षाच्या प्रियेसीच्या घरात घूसून तिच्यावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर स्वतःच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडून घेतला. ही धक्कादायक घटना मुंबईतल्या मालाडमधील कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये घडली आहे. हल्ला केल्यानंतर महिला जखमी अवस्थेत जमिनीवर कोसळल्यानंतर आरोपीने क्रूरपणे तिचे केस कापले. या घटनेत प्रेयसी आणि प्रियकर दोघेही गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी दोघांनाही कुपर रुग्णालयात दाखल केले आहे.

सचिन चौहान (वय 58) असे आरोपीचे नाव आहे. याबाबतची माहिती अशी की, मालाडमधली कुरार विलेज येथील पुष्पा पार्कमध्ये एका इमारतीमधील एक 58 वर्षीय घटस्फोटीत महिला तिच्या 80 वर्षीय आई, दोन मुली आणि एका मुलासोबत राहते. या महिलेचे 55 वर्षीय वाहन चालक सचिन चौहान याच्याशी प्रेमसंबंध होते. जवळपास 15 वर्षांपासून या दोघांचे प्रेमसंबंध असल्याने आरोपीचे महिलेच्या घरी येणे जाणे होते. 1 नोव्हेंबरला आरोपी सचिन चौहान प्रेयसीला भेटाण्यासाठी तिच्या घरी गेला. परंतु प्रेयसीच्या आईने सचिनला घरात घेण्यास नकार दिला. यावरुन सचिनसोबत त्या महिलेचे आणि तिच्या आईचे भांडण झाले. नंतर 15 नोव्हेंबरच्या दिवशी सकाळी सात वाजता ही महिला कामावर जाण्यासाठी निघताच सचिनने घरात प्रवेश केला. पुन्हा सचिनसोबत त्या महिलेचे कडाक्याचे भांडण झाले. भांडण इतके टोकाला पोचले की सचिनने आपल्यासोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर, अंगावर सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता अमानुषपणे महिलेचे केस देखील चाकूने कापले. नंतर सोबत आणलेला सुतळी बॉम्ब स्वत:च्या तोंडात फोडून घेतला. या विचित्र घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांवर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे. कुरार पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास केला जात आहे.