सामूहिक हत्याकांडाने खळबळ ! कुटुंबातील 6 जणांचा खून करून ‘तो’ पोलिसांसमोर ‘हजर’

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका माथेफिरू तरुणाने आपल्याच कुटुंबातील 6 जणांचा लॉकडाऊनमध्ये खून केल्याने खळबळ उडाली आहे. आरोपीने दोन लहान मुलांनाही नर्दयीपणे ठार केलं. त्यांचे गळे कापून त्यांचा खून केला असून या हत्याकांडामुळे लखनऊ शहर हादरून गेलं आहे. सामूहिक हत्याकांडानंतर या तरुणाने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. ही घटना बंथरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या गोदौली गावात घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गोदौली गावातील अजय नावाच्या तरुणाने धारदार शस्त्राने सपासप वार करून आई-वडील, भाऊ आणि त्याची पत्नी दोन मुलं यांना ठार मारले. तरुण माथेफिरु असल्याचे सांगितले जात आहे. सहा जणांचा खून केल्यानंतर तो स्वत:च पोलीस ठाण्यात पोचला आणि आत्मसमर्पण केलं.
पोलिसांना तरुणाने हत्यांकांडाची माहिती देताच पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी घेऊन गेले. त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात सहा जणांचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीला अटक करुन पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.

पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली आहे की, आरोपीच्या घरात संपत्तीच्या कारणावरून वाद होते. यातच अजयला घरच्यांनी काही संपत्ती त्याच्या अपरोक्ष विकल्याची माहिती मिळाली. त्यानंतर चिडलेल्या अजयने सहा जणांचा खून केला. सध्या आरोपीची चौकशी सुरु असून या घटनेमुळे गावात भीती निर्माण झाली आहे.