शेतकरी जोडप्याला पोलिसांनी मारहाण केल्यानं MP मध्ये प्रचंड खळबळ, प्रशासनाकडून जिल्हाधिकार्‍यासह SP ची तडकाफडकी बदली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील गुना मध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी शेतकरी जोडप्याला काठीने मारहाण केली, त्यानंतर शेतकरी दाम्पत्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांना तातडीने हटवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी हा व्हिडीओ जारी करत म्हटले आहे की, ‘गुनाच्या कॅंट भागात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ पाहून मी दु:खी आहे. अशा दुर्दैवी घटना टाळल्या पाहिजेत. मुख्यमंत्र्यांनी तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. भोपाळ येथून तपास पथक घटनास्थळाला भेट देऊन संपूर्ण घटनेची चौकशी करेल. यानंतर जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई केली जाईल.’

कॉंग्रेसने शिवराज सरकारला घेराव घातला
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी या घटनेसंदर्भात शिवराजसिंह चौहान सरकारला घेराव घातला आहे. कॉंग्रेस नेते कमलनाथ यांनी ट्विट केले की, ‘हे शिवराज सरकार राज्याला कुठे घेऊन जात आहे? हे कोणते जंगल राज आहे? गुनातील कॅन्ट पोलिस स्टेशन परिसरात एक दलित शेतकरी जोडप्यावर मोठ्या संख्येने पोलिसांकडून क्रूरपणे लाठीचार्ज होतो.’ तसेच ते म्हणाले, ‘पीडित तरुणाच्या जमिनीसंबंधित शासकीय वाद असला, तरी तो कायदेशीररित्या सोडवला जाऊ शकतो, परंतु अशा प्रकारे कायदा हातात घेत त्याला, त्याच्या पत्नीला, कुटुंबाला आणि निष्पाप मुलांना क्रूरपणे मारहाण करणे, हा कुठला न्याय आहे? हे सर्व यामुळे की ते दलित कुटुंबातील आहेत, गरीब शेतकरी आहेत?

कमलनाथ यांनी प्रश्न केला की, ‘शिवराज सरकार या भागातील तथाकथित लोकसेवक आणि प्रभावशाली लोकांच्या ताब्यात असलेल्या हजारो एकर सरकारी जमिनी मोकळ्या करण्यासाठी असे धैर्य दाखवेल काय? अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही. त्यांच्या दोषींवर त्वरित कडक कारवाई केली पाहिजे, अन्यथा कॉंग्रेस गप्प बसणार नाही.’

काय आहे संपूर्ण प्रकरण
गुना येथे मॉडल महाविद्यालयाच्या बांधकामासाठी जगनपूर चक परिसरातील शासकीय महाविद्यालयीन व्यवस्थापनाला 20 बीघा जमीन देण्यात आली होती. या भूभागावर गब्बू पारदी नावाच्या व्यक्तीने बर्‍याच दिवसांपासून कब्जा केला होता. काही काळापूर्वी महसूल व पोलिस पथकाने एकत्रितपणे अतिक्रमण हटवले. तसेच ही जमीन महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडे देण्यात आली. परंतु, विभागाच्या दुर्लक्षामुळे या जागेवर बांधकाम होऊ शकले नाही, त्यामुळे अतिक्रमणधारकांनी पुन्हा जमीन घेण्यास सुरुवात केली.

असे सांगितले जात आहे की गब्बू पारदी यांनी ती जमीन पैसे घेऊन काही शेतकऱ्यांना दिली होती, त्यानंतर त्या शेतकर्‍यांनी तेथे शेती करण्यास सुरवात केली. महाविद्यालय व्यवस्थापनाच्या तक्रारीवरून महसूल व पोलिस विभाग पुन्हा घटनास्थळी पोहचले आणि जमीन रिकामी करण्याची कारवाई केली तेव्हा प्रकरण अधिकच चिघळले. यावेळी पोलिसांनी एका शेतकरी जोडप्याला मारहाण केली, त्यानंतर त्यांनी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.