Video बाप बाप असतो ! मुलाच्या 10 वीच्या परीक्षेसाठी 105 किलो मीटर चालवली सायकल

धार : वृत्तसंस्था – सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने एका 38 वर्षांच्या बापाने आपल्या 15 वर्षांच्या मुलाला घेऊन तब्बल 105 किलो मीटरचा प्रवास सायकलवरून केला. मध्य प्रदेशातील धार येथील हा प्रकार असून मुलाची दहावीची पुरवणी परीक्षा चुकू नये म्हणून या वडीलांनी 105 किलो मीटरचे अंतर चक्क सायकलवरून कापले. त्यांचे नाव शोभराम असून ते स्वत: अशिक्षित असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्व समजले असल्याचे ते सांगतात. परीक्षा चुकल्याने मुलाचे एक वर्ष वाया जाऊ नये, अशी त्यांची इच्छा होती.

कोविड-19 मुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे, शिवाय खिशात पैसा नसल्याने शोभरामने आपल्या मुलाला सायकलवरून 105 किमी अंतरावरील धार गावी नेण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांचे दहावीचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुरवणी परीक्षा घेण्याची रुक जाना नहीं योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केली आहे. या योजनेंतर्गत पहिल्या प्रयत्न ज्या विषयात पास होता आले नाही, तो विषय पुन्हा सोडवण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. शोभराम यांनी बुधवारी सांगितले की, कोरोना व्हायरसमुळे बस वाहतूक बंद आहे, वाहतुकीचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते. जर मी ही संधी सोडली असती तर माझ्या मुलाचे एक वर्ष वाया गेले असते. म्हणून मी सायकलवरून मुलाला नेण्याचे ठरवले.

आमच्याकडे पैसे नाहीत, मोटार सायकलही नाही, कोणीही मदत करत नाही. परंतु माझ्या मुलाचे जीवन सुधारण्यासाठी मी त्याला धार येथे सायकलवरून परीक्षा देण्यासाठी नेले, असे शोभराम म्हणाले.आम्ही दोन-तीन दिवसांचे जेवण आणि खाण्याच्या वस्तू सोबत घेतल्या आणि सोमवारी सकाळी धारसाठी सायकल चालवण्यास सुरूवात केली. वाटेत मनवार शहरात रात्रीचे काही तास घालवल्यानंतर परीक्षा सुरू होण्यापूर्वी मंगळवारी सकाळी धार येथे पोहचलो, असे शोभराम यांनी सांगितले. शोभराम यांचा मुलगा आशिष म्हणाला, मी दहावीत शिकत आहे. परीक्षा देण्यासाठी मी वडीलांसोबत येथे सायकलवरून आलो.