Satara : जंगली गव्याला रोज पाव खायला देणं ‘त्या’ व्यक्तीला पडलं महागात

महाबळेश्वर : पोलीसनामा ऑनलाइन – महाबळेश्वर येथे चक्क गव्याला एक व्यक्ती पाव खायला देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. इब्राहिम महंमद पटेल (रा. रांजणवाडी, महाबळेश्वर) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. तर यावरून वनविभागाकडून वन्यजीव अधिनियमानुसार नोटीस देण्यात आली आहे. वन्यजीव तज्ञांनी हा प्रकार चुकीचा आहे आणि तो त्वरित थांबवण्यात यावा असे म्हटले आहे.

इब्राहिम पटेल यांचे महाबळेश्वर येथे शेती आणि हॉटेल असून, त्यांच्या शेतामध्ये मागील काही महिन्यापासून सायंकाळच्या दरम्यान गवे चरायला येत होते. परंतु पटेल हे प्राणिमात्रांवरील दयेतून या गव्यांना खायला पाव देऊ लागले. असे रोज होत असल्याने, जवळीक वाढली न भीता पटेल गव्यांना हाताने पाव खाऊ घालू लागले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पसरला गेला. यामुळे परिसरात आणि समाजमाध्यमांमध्ये उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. वन्यजीवांना खाद्यपदार्थ भरवणे नियमबाह्य आहे. इब्राहिम पटेल यांचा हेतू लक्षात घेऊन वन्यजीव अधीनियमानुसार नोटीस देण्यात आली असल्याचे महाबळेश्वरचे वनक्षेत्रपाल दिलीप झगडे यांनी दिली आहे.

तसेच प्राण्यांना मानवाने बनविलेले खाद्य घालणे हे निसर्गविरोधी कृती आहे. प्राण्यांना खाद्यपदार्थ भरवल्याने त्यांना त्याची सवय लागते. ज्यावेळी हे पदार्थ मिळत नाहीत, तेव्हा माणसांवर ते हल्ले करून ते हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतात. यातून माणसाच्या किंवा प्राण्यांना जीवितास धोका पोहोचू शकतो. निसर्ग हा प्रत्येक प्राण्याची योग्य काळजी घेतच असतो. त्यामुळे प्राण्यांना मानवी खाद्य भरवण्याची गरज नसते. मोर, माकड, कबुतरे अशा प्राण्यांना बाह्य खाद्य घालु नये. प्राण्यांना विविध आजार असू शकतात. ते आजार माणसातही येऊ शकतात असे तेथील प्राणीप्रेमींनी सांगितले आहे.