भाजप आमदाराची CM ठाकरेंवर टीका म्हणले – ‘मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होतं, ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्रानं पाहिलं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी (दि 21 फेब्रुवारी) जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाढत्या कोरोना रुग्णांवरून चिंता व्यक्त करत लोकांनी नियम पाळले नाहीत, तर पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल असे संकेत दिले. यावेळी त्यांनी विरोधकांसह सहकारी पक्षांचेची कान टोचले. लोकल, मंदिरं सुरू करा म्हणून आंदोलन करणारे वाचवायला येणार नाहीत असं म्हणत त्यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

अतुल भातखळकर म्हणाले, मुख्यमंत्री थापा मारतात हे आम्हाला ठाऊक होतं. ते खोटंही बोलतात हे आज महाराष्ट्रानं पाहिलं. आफ्रिकेत पाठवलेल्या लसीबद्दल जे बोलले ते साफ खोटं आहे. आफ्रिकेतून तसा खुलासाही आला आहे. मोदीद्वेषाची कावीळ बळावल्याचे हे परिणाम आहेत, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री खोटारडा अशा भाषेत त्यांनी टीका केली आहे.

पुढं बोलताना भातखळकर म्हणाले, मुख्यमंत्र्यांचं भाषण म्हणजे अकार्यक्षम मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं. लसीकरणात महाराष्ट्राचा नंबर देशात सर्वात शेवटचा का ? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे, संचारबंदी आणि लॉकडाऊन असे इशारे देऊन काही फायदा होणार नाही, स्वत:च्या अपयशाबद्दल जनतेला दोष देऊ नका असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?
देशातून साऊथ आफ्रिकेत पाठवलेल्या कोरोना लसीचे डोस पुन्हा भारतात पाठवण्यात आले आहेत. या लसीचे डोस देशासाठी उपयोगी ठरतील तसंच आणखी काही डोस राज्याला मिळणार आहेत, त्यामुळं ते डोस मिळाल्यावर सामान्य नागरिकांना लसीकरण करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं.