Lockdown : ‘या’ राज्यानं वाढवला 2 आठवडयांचा ‘लॉकडाऊन’, महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडं सर्वांचं लक्ष

चंदिगढ :  वृत्तसंस्था –  कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनला आता महिना होत आला आहे. मात्र तरीही देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी अजून काही काळासाठी वाढवण्याचे संकेत काही राज्यांनी दिले. दरम्यान, पंजाब सरकारने लॉकडाऊनबाबत मोठा निर्णय घेताना राज्यातील लॉकडाऊन अजून दोन आठवड्यांनी वाढवला आहे. पंजाबने सर्वप्रथम 15 दिवस लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली आहे. आता सर्वांचे लक्ष कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राकडे लागले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख राज्यातील लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भाच्या निर्णयाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांकडे असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय घोषणा करतात याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिले आहे. राज्यात कालपर्यंतच्या आकडेवारीनुसार कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 9318 झाली आहे. ही देशातील सर्वात मोठी संख्या आहे. आज राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजाराचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. राज्यात मुंबई आणि पुण्यात सर्वाधिक प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या दोन देशातील लॉकडाऊन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिल रोजी देशवासीयांना संबोधित करताना देशातील लॉकडाऊनचा दुसरा टप्पा 3 मे पर्य़ंत वाढवण्याची घोषणा केली होती. हा कालावधी चार दिवसांनी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाब सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. राज्यात कोरोनाचे 322 रुग्ण सापडले आहेत तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 हजाराच्या जवळ पोहचली असून 400 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात किती दिवसांचा लॉकडाऊन वाढवणार हे आता पहावे लागणार आहे.