Unlock-3 : पुढच्या आठवड्यापासून मॉल उघडणार, पण इतर गोष्टींवर 31 ऑगस्टपर्यंत स्थगिती लागू, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारकडून कंटेनमेंट झोनमधील 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाऊनची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन कायम असणार आहे. यासंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आदेशात लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करण्यासोबत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचे कठोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


नव्या आदेशात जुन्या गाइडलाइन्समध्ये बदल करण्यात आलेला नाही. पण महत्त्वाचं म्हणजे मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्ताराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करण्यासाठी फूड कोर्ट आणि रेस्ताराँ आपलं किचन सुरु ठेऊ शकतात.

सोबतच आऊटडोर खेल ज्यामध्ये संघाची गरज नाही असे गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखांब यांना 5 ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल सुरु करण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.

दरम्यान, दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टँक्सी, कॅबमध्ये 1 अधिक 3, रिक्षामध्ये 1 अधिक 2, चारचाकीमध्ये 1 अधिक 3 आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.