Mumbai News : Google Map नं दर्शविलेल्या रस्त्यानं गेले 3 लोक, धरणात बुडाली कार; एकाचा ‘मृत्यू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बऱ्याचदा अज्ञात ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला गुगल मॅपचा सहारा घ्यावा लागतो, परंतु बर्‍याच वेळा यामुळे अडचणींचा सामना देखील करावा लागतो. महाराष्ट्राच्या अहमदनगरमधील एका व्यक्तीला गुगल मॅपची मदत घेणे महागात पडले आणि त्या व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागले.

ट्रेकिंग करण्यासाठी गेले होते तीन मित्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात राहणारे तीन व्यावसायिक गुरु शेखर (42), समीर राजूरकर (44) आणि सतीश घुले (34) हे फॉर्च्यूनर कारमधून महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई येथे ट्रेकिंग करण्यासाठी निघाले होते, पण त्यांना योग्य मार्ग माहित नव्हता. यानंतर रविवारी रात्री 1:45 वाजेच्या सुमारास त्यांनी गुगल मॅप (Google Map) ची मदत घेतली.

गुगल मॅपने चुकीच्या मार्गावर पाठविले
अकोले पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अभय परमार म्हणाले, ‘ट्रेकिंगसाठी कळसूबाईकडे जात असताना गुगल मॅपने त्यांना जवळचा रस्ता दाखविला, जो त्यांना थेट धरणाच्या दिशेने घेऊन गेला आणि त्यांची कार पाण्यात बुडाली.’ पोलिसांनी सांगितले की हा रस्ता पावसाळ्यामध्येच बंद करण्यात आला होता, कारण पिंपळगावचा बराच भाग धरणाच्या पाण्यात बुडाला होता.

चार महिने बंद असतो रस्ता
पोलीस अधीक्षक राहुल मधने म्हणाले की, अपघाताच्या ठिकाणी एक पूल बांधण्यात आला आहे, जो केवळ आठ महिने चालू असतो. पावसाळ्यानंतर चार महिन्यांसाठी तेथे बांधण्यात आलेल्या बांधाला उघडले जाते. धरणातून पाणी सोडल्यामुळे हा पूल पाण्याखाली जातो आणि त्याचा वापर बंद होतो.

गुगल मॅपवर विश्वास ठेवणं पडलं महागात
पोलिसांनी पुढे सांगितले की, ‘रस्ता बंद झाल्याची माहिती स्थानिकांना होती, परंतु कार चालविणारा सतीश घुले गुगल मॅपवर अवलंबून होता आणि अंधारामुळे कार सरळ पाण्यात गेली.’

खिडकी फोडून 2 जणांनी वाचवले आपले प्राण
पोलिसांनी सांगितले की शेखर आणि राजूरकर अपघाता दरम्यान कारची खिडकी फोडून बाहेर पडले आणि पोहून त्यांनी त्यांचे प्राण वाचवले, परंतु सतीश घुलेला पोहता येत नव्हते त्यामुळे त्याने आपला जीव गमावला.