आमदार निवास बॉम्बनं उडवून देण्याचा कॉलमुळे पोलिसांची पळापळ

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईतील आकाशवाणी समोर असलेले आमदार निवास बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा एक फोन काल रात्री पावणेबाराच्या सुमारास पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलीस आणि बॉम्ब स्क्वाड यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या कारणास्तव करण्यात आलेल्या शोध मोहिमेममध्ये बॉम्ब सापडला नसल्याची माहिती समोर आली आहे. शोध मोहिमेनंतर हा फोन दिशाभूल करणारा असल्याची माहिती समोर आली.

आमदार निवासाला अज्ञात क्रमांकावरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली. या घटनेची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा खडबडून जाग्या झाल्या होत्या. तातडीने श्वानपथक, बॉम्ब स्क्वाड आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या सर्वांना त्वरित बाहेर काढून इमारत रिकामी केली. तब्बल दोन तास सुरू असलेल्या शोधमोहिमेनंतर ही दिशाभूल करणारा कॉल असल्याची माहिती उघड झाली.

पोलिसांनी आमदार निवासात कॉल करून धमकी देणार्‍या व्यक्तीचा नंतर शोधला असून त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, यावर लवकारत लवकर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानही उडवून देण्याची धमकी आली होती. त्यामळे खळबळ उडाली होती.