मुख्यमंत्र्यांनी दिला ‘इशारा’ अन् घटली कोरोना रुग्णवाढ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यानुसार, विविध शहरांत पुन्हा एकदा अनेक निर्बंध लादली जात आहेत. त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाल्याचे दिसत आहे.

रविवारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7 हजारांवर गेली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा इशारा आणि प्रशासनाने केलेली विशेष तयारी त्यामुळे आता हा आकडा 5 हजारांवर आला आहे. गेल्या 24 तासांत राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 5,210 झाली आहे. तर कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. 5,035 रुग्ण कोरोनावर उपचार करून घरी परतले आहेत. तर यातील विशेष बाब म्हणजे कोरोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटली आहे. राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची चिन्हे असतानाच ही कमी झालेली आकडेवारी दिलासादायक ठरत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी कोरोना व्हायरसची सध्याची परिस्थिती सांगितली. त्यानुसार, त्यांनी कोरोनाचे नियम पाळा, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि विनामास्क फिरू नका, असे आवाहन केले होते.

लॉकडाऊनचा इशारा अन् रुग्णसंख्या कमी
सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे वारंवार मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच जर लॉकडाऊन नको असेल तर कोरोनाविषयक नियम पाळावेच लागतील, असे खडसावूनही त्यांनी सांगितले. याशिवाय त्यांनी सार्वजनिक, राजकीय आणि सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांनाही बंदी घातली आहे.