Coronavirus in Maharashtra : चिंताजनक ! राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, गेल्या 24 तासात 6218 नवे पॉझिटिव्ह

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असल्याचे अलिकडील काळातील आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात आढळून येणार्‍या नव्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी झाली होती मात्र आज (मंगळवार) अचानकपणे कोरोनाच्या नवीन रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाचे 6218 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे आता खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

गेल्या 24 तासात 5869 रूग्ण हे कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात 51 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 21 लाख 12 हजार 312 पर्यंत पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 20 लाख 5 हजार 851 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यातील तब्बल 51 हजार 857 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 53 हजार 409 रूग्ण हे सक्रिय आहेत.