Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा हाहाकार ! गेल्या 24 तासात 62 हजाराहून अधिक नवीन रुग्ण, 519 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. मागिल काही दिवसांपासून राज्यात रुग्ण वाढीचा दर वाढला असून रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पंरतु रुग्णसंख्या कमी होत नसल्याने कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. उद्या मुख्यमंत्री लॉकडाऊनची घोषणा करणार आहेत. रुग्णसंख्या वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. आज राज्यात 62 हजार 097 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज राज्यात 54 हजार 224 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 32 लाख 13 हजार 464 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.14 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 61 हजार 343 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.55 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 83 हजार 856 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 17 हजार 521 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 43 लाख 41 हजार 736 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 39 लाख 01 हजार 359 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.27 टक्के आहे. सध्या राज्यात 38 लाख 76 हजार 998 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 27 हजार 690 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.