Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चा कहर सुरुच ! गेल्या 24 तासात 895 रुग्णांचा मृत्यू, 66 हजाराहून अधिक नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या 60 ते 67 या दरम्यान आढळून येत आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. सोमवारी (दि.26) राज्यात 48 हजार रुग्ण आढळून आल्याने कडक निर्बंधाचा फायदा होत असल्याचे वाटले होते. मात्र, आज पुन्हा राज्यात 66 हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्ण संख्या वाढली असली तरी गेल्या 24 तासात नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात 66 हजार 358 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 67 हजार 752 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

गेल्या 24 तासात राज्यात 66 हजार 358 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 67 हजार 752 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 36 लाख 69 हजार 548 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.21 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 895 रुग्णांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 1.5 टक्के आहे.

सध्या राज्यामध्ये 6 लाख 72 हजार 434 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 1 लाख 04 हजार 561 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2 कोटी 62 लाख 54 हजार 737 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 44 लाख 10 हजार 085 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 16.80 टक्के आहे. सध्या राज्यात 42 लाख 64 हजार 936 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 30 हजार 146 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.