एक दिवसासाठी महेश बाबूचा मेणाचा पुतळा येणार भारतात 

मुंबई : वृत्तसंस्था – जगप्रसिद्ध मादाम तुसाद संग्रहालयात साऊथ सुपरस्टार महेश बाबू याचा मेणाचा पुतळा लवकरच उभारला जातोय. एप्रिल २०१८ मध्ये खुद्द महेशबाबूनेचं याचा खुलासा केला होता. आता महेशबाबूचा हा मेणाचा पुतळा एका दिवसासाठी भारतात येणार आहे. होय,  मादाम तुसाद संग्रहालयाच्या आधी हा पुतळा एका दिवसासाठी हैदराबादमध्ये आणणार आहे. हैदराबादेतील एएमबी सिनेमा थिएटरमध्ये हा पुतळा ठेवण्यात येईल. त्यामुळे महेश बाबूंच्या चाहत्यांना हा पुतळा प्रत्यक्ष पाहता येणार आहे.

फक्त चाहत्यांच्या आग्रहाखातर हा पुतळा हैदराबादेत आणणार आहे. याआधी कोणत्याही सेलिब्रिटीचा पुतळा अशा प्रकारे भारतात आणला न्हवता ही पहिलीच वेळ असणार आहे. या नंतर हा पुतळा मादाम तुसादच्या मलेशिया येथील संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे.

साऊथच्या अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये महेश बाबूने काम केले आहे. चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याआधी महेश बाबूने अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणूनही भूमिका केल्या आहे. महेश बाबू याने १९९९ मध्ये ‘राजा कुमारुदु’ या सिनेमातून अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली होती या चित्रपटात प्रिती झिंटा त्याची हिरोईन होती.