Solapur News : माजी जिल्हाप्रमुख महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –   सोलापूर महापालिकेतील विरोधी पक्षनेते महेश कोठे (Mahesh Kothe)  यांनी शिवसेनेतून (Shivsena) राष्ट्रवादीत  (NCP) प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. अशातच शुक्रवारी (८ जानेवारी) कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितले. मातोश्रीवरुन आलेल्या आदेशानुसार कारवाई केल्याचे बरडे म्हणाले.

शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये महेश कोठे राष्ट्रवादीत प्रवेश करणार होते. त्या पार्श्वभूमीवर कोठे आपल्या समर्थकांसोबत गुरुवारी रात्रीच मुंबईत पोहचले. पण, प्रवेशाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. प्रथम कोठे यांना भेटायला सांगा मग बाकीचा कार्यक्रम नंतर होईल, असा निरोप शरद पवार यांच्या कार्यालयातून आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसारच कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याचे, पुरुषोत्तम बरडे यांनी सांगितलं.

शरद पवार मला न्याय देतील…

विधानसभा निवडणुकीत माझी उमेदवारी डावलण्यात आली. उध्दव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर आहे. मात्र, त्यांच्या जवळचे लोक आम्हाला चांगली वागणूक देत नाहीत. परवा सोलापुरात आल्यानंतर उध्दव ठाकरेंनी मला मुंबईत भेटायला बोलावले. पण जवळच्या लोकांनी वेळ दिली नाही. शरद पवार मला न्याय देतील असे वाटते. मी कुणावरही वैयक्तिक टीका करणार नाही, असे महेश कोठे म्हणाले.