‘मी मासिक पाळीत आहे’ असं लिहिलेलं ‘अ‍ॅप्रन’ घालून महिलांनी केला ‘स्वयंपाक’, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांनी केलं ‘जेवण’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीच्या मयूर विहार परिसरातील सेंट्रल पार्कमध्ये एक कार्यक्रम सुरू होता. कार्यक्रमात काही महिला जेवण बनवत होत्या. परंतु, जे अ‍ॅप्रन घालून महिला जेवण बनवत होत्या त्यावर काही ओळी लिहिलेल्या होत्या. अ‍ॅप्रनवर हिंदीत लिहिले होते की, मला मासिक पाळी आली आहे. या कार्यक्रमात दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया पोहचले होते.

येथील दृश्य पाहिल्यानंतर उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी त्या महिलांच्या हातूनच जेवण वाढून घेतले आणि जेवायला बसले. या कार्यक्रमाला नाव देण्यात आले होते, महावारी महाभोजन. कार्यक्रमाचा एक फोटोसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत आहे फोटो
23 फेब्रुवारी 2020, रविवारी दुपारी मयूर विहार फेज-2 च्या सेंट्रल पार्कमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून मनीष सिसोदिया यांना आमंत्रित करण्यात आले होते. सोशल मीडियावर मनीष सिसोदियांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर लोक त्यांचे कौतूक करत आहेत.

एक बाबाच्या वक्तव्याच्या विरोधात होते महावारी महाभोजन
भुजमध्ये स्वामी नारायण मंदिराचे स्वामी कृष्णस्वरूप दास बाबा यांनी एक वक्तव्य केले होते. त्यांचे म्हणणे होते की, जो पुरूष मासिक पाळी असलेल्या महिलेच्या हातचे अन्न खातो, तो पुढल्या जन्मात बैल होतो. तर ज्या बाईला माहित असते की आपल्याला मासिक पाळी आली आहे आणि तरी सुद्धा ती जेवण बनवून इतरांना देते ती पुढील जन्मी कुत्रीचा जन्म घेते. बाबाच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच भूजच्या एका हॉस्टेलमध्ये सुद्धा यावरून गोंधळ झाला होता. हे हॉस्टेल त्याच मंदिरात येते जेथील हे स्वामी आहेत.