ठाण्यात मोठी कारवाई ! ‘कोरोना’ग्रस्तांकडून अवास्तव बिल वसूल करणार्‍या रुग्णालयाची मान्यता रद्द

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना काळात रुग्णांना लुटणार्‍या रुग्णालयांवर आता ठाणे महापालिकेने करडी नजर ठेवली आहे. ठाणे महानगरपालिकेने रुग्णांकडून अवास्तव बील वसूल करणार्‍या रुग्णालयावर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केलीय. घोडबंदर रोडवरील ‘होरिझन प्राईम’ रुग्णालयावर महापालिका प्रशासनाने कारवाई करता एक महिन्यांसाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द केलीय.

ठाणे महानगरपालिकेने आरोग्य व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी खासगी रुग्णालयांना कोविड हॉस्पिटलची मान्यता दिलीय. परंतु या रुग्णालयांकडून रुग्णांकडून अवाजवी बिले आकारली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाने लेखा परिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाच्या भरारी पथकाने ठाण्याच्या विविध रुग्णालयांमध्ये जाऊन रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांची ऑडिट सुरू केली आहेत. त्यात ठाण्याच्या होराइजन प्राईम हॉस्पिटलमधून पालिका प्रशासनाने दिलेल्या दर आकारणी पेक्षा अधिक बिल आकारलेली अशी 56 बिले आढळून आली.

यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाकडून खुलासा न आल्यामुळे अखेर ठाणे महानगरपालिकेने या रुग्णालयाचा कोविड केअर रुग्णालयाचा दर्जा रद्द केला आहे. तसेच एका महिन्यांसाठी या रुग्णालयाची मान्यता रद्द केली आहे, अशी माहिती मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.राजेंद्र मुरुडकर यांनी दिली आहे.

‘होरायझन प्राईम’ रुग्णालय प्रशासनाने पालिकेने केलेल्या या कारवाईच्या विरोधात महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. महापालिकेने आमचं म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी कार्यवाही केली आहे, असा आरोप होरायजण प्राईम हॉस्पिटलचे मेडिकल डायरेकटर ऋषिकेश वैद्य यांनी केला आहे.

रुग्णांकडून अवाजवी बिल वसूल करणार्‍या अशा रुग्णालयांवर चाप लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. रुग्णालय प्रशासनाकडून अशी जर अवाजवी बिल आकारले जातील तर नागरिकांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून केले आहे.

अवास्तव बिल आकारणीमुळे इतर रुग्णालयांचीही प्रतिमा होतेय मलिन

काही रुग्णालये रुग्णाची आर्थिक परिस्थिती न पाहता अवास्तव बिल आकारून त्यांना जेरीस आणत आहेत. त्यामुळे रुग्णालयाची प्रतिमेबाबत आणि तेथे सेवा देणार्‍या डॉक्टर्स आणि नर्स यांच्याबाबतही नकारात्मक भावना वाढीस लागत आहे.

तसेच काही रुग्णालये अवास्तव बिल आकारत असल्यामुळे रुग्ण तसेच त्यांचे नातेवाईक इतर रुग्णालयाबाबतही तसाच अर्थात नकारात्मक विचार करू लागतात. त्यामुळे एका रुग्णालयाच्या अशा वर्तणुकीमळे इतरही चांगल्या रुग्णालयांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे नागरिकांचा, रुग्णांचा आणि नातेवाईकांचाही रुग्णालयांकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक होत आहे.