मोदींच्या शपथ ग्रहण समारंभाला उपस्थित राहणार ‘दीदी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उर्फ दीदी यांनी ३० मे रोजी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथग्रहण समारंभाला उपस्थित राहण्याचे संकेत दिले आहेत. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. ते राष्ट्रपती भवनात होणाऱ्या शपथ ग्रहण समारंभाला उपस्थित राहणार आहेत. यांमुळे मी पण या समारंभात सहभागी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३० मे रोजी राष्ट्रपती भवनात संध्याकाळी ७ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासोबत काही मंत्र्यांनाही शपथ देण्यात येणार आहे. राष्ट्रपती भवनाकडून ट्विट करून ही माहिती देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान पश्चिम बंगाल मध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी झाली होती. भाजप अध्यक्ष अमित शहा आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये चांगल्याच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. अशा या तापलेल्या वातावरणात ममता दीदी नरेंद्र मोदी यांच्या शपथ ग्रहण समारंभाला उपस्थित राहतील कि नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर ममता बॅनर्जी यांनी शपथ ग्रहण समारंभाला उपस्थित राहण्याचे संकेत दिले आहेत.