काय सांगता ! हो, एका माशीला मारण्याच्या नादात घरालाच लागली आग !

पोलिसनामा ऑनलाइन – फ्रान्समधील दोर्दोन प्रांतातील एका गावातून एका माशीला मारण्याच्या नादात अख्या घरालाच आग लागली असल्याची घटना समोर आली आहे. त्रास देणाऱ्या माशीला मारण्याचा प्रयत्न एका 80 वर्षांच्या आजोबांच्या जीवावर बेतला असता.

सदर आजोबा रात्रीच्या वेळी घरात जेवण करत होते. परंतु अचानक एक माशी त्यांच्या अवतीभोवती फिरू लागली. सुरुवातीला तर आजोबांनी याकडं दुर्लक्ष केलं. परंतु त्यांना तिचा जास्तच त्रास होऊ लागला. यानंतर त्यांनी माशी मारण्याची इलेक्ट्रीक रॅकेट उचलली. यानंतर आजोबा आणि माशी यांचा खेळ सुरू झाला. ही माशी देखील आजोबा आणि त्यांच्या हातातली रॅकेटला हुलकावणी देत होती. नंतर तर ही माशी स्वयंपाक घरात शिरली आणि इथंच सारा घोळ झाला.

माशीचा पाठलाग करत आजोबादेखील स्वयंपाक घरात गेले. परंतु याचवेळी इलेक्ट्रीक रॅकेट गॅसच्या शेगडीजवळ नेली असता अचानक स्फोट झाला. याच स्फोटामुळं आग लागली. ही आग पसरू लागली. या आगीच घरचे छप्पर जळून गेले आहे. या आजोबांची प्रकृती सुदैवानं चांगली आहे आणि त सुखरूप आहेत. गॅस गळती आणि इलेक्ट्रीक रॅकेट यांच्यामुळं आग लागली असल्याचं बोललं जात आहे. परंतु नेमकं कारण मात्र समोर आलेलं नाही. म्हणूनच इलेक्ट्रीक रॅकेटचा वापर करून माशांना किंवा मच्छरांना मारताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.