सांगली : भेंडवडे येथील खून प्रकरणी एकाला सक्तमजुरीची शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – भेंडवडे (ता. खानापूर) येथे किरकोळ कारणावरून एकाचा डोक्यात काठी मारून खून केल्याप्रकरणी एकाला ३ वर्षे सक्तमजुरी तसेच ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. पिराजी महादेव जगदाळे (वय ४०) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. सातवळेकर यांनी ही शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे माधव कुलकर्णी यांनी काम पाहिले. ऑगस्ट २०१४ मध्ये ही घटना घडली होती.

भेंडवडे येथे मृत बाबूराव धोंडीराम जगदाळे व पिराजी राहत होते. त्यांच्यात शेतातील रस्त्यावरून वारंवार वाद होत होता. घटनेच्या दिवशी सकाळी बैलाचे कासरे तोडल्याच्या संशयावरून बाबूराव यांचा मुलगा अनिल याला पिराजीने मारहाण केली होती. काही वेळाने जाब विचारण्यासाठी बाबूराव व अनिल गेले. त्यावेळी पिराजीने चिडून बाबूराव यांना कळकाच्या दांडक्‍याने डोक्यात मारून जखमी केले. बाबूराव यांच्या डोक्‍याच्या पाठीमागे वर्मी घाव बसला. अतिरक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. अनिललाही पिराजीने दांडक्‍याने मारहाण केली.

नंतर अनिल याने विटा पोलिस ठाण्यात पिराजी याच्याविरोधात फिर्याद दिली. तत्कालीन निरीक्षक अनिल पोवार यांनी तातडीने संशयितास अटक केली. आरोपीविरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारपक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानुसार पिराजी याला दोषी धरून शिक्षा सुनावण्यात आली.

आरोग्यविषयक वृत्त –