Pune News : ‘आम्ही मंचरचे भाई आहोत’, भाईगिरी करणारे गजाआड

मंचर/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे डायलॉगबाजी करुन भाईगिरी केली जाते त्याच पद्धतीने मंचरमध्ये भाईगिरी करणाऱ्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ‘आम्ही मंचरचे भाई आहोत, तू येथे धंदा कसा करतोस तेच बघतो’, अशी धमकी व्यावसायिकाला देऊन शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना मंचर शहरातील गोसावीबाब मंदिरात घडली आहे.

भाईगिरी करणारे राण्या बाणखेले (वय-27) व तुषार मोरडे (वय-23 दोघे रा. मंचर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी गिरीश जगन्नाथ थोरात (रा. चांडोली बुद्रुक, ता. आंबेगाव) आणि रमेश शेंगाळे (रा. मंचर) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंचर पोलिसांनी आरोपींना मंगळवारी (दि.19) अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश थोरात हे मंचर शहरातील गोसावीबाबा मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी मंदिरात आलेला बाणखेले आणि मोरडे या दोघांनी ‘तू मंचरचा भाई झाला आहेस का ?’ असे म्हणत थोरात यांच्या पाठीत दगड मारून पायावर मारहाण केली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी थोरात यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी त्यांना मदत करण्यासाठी रमेश शेंगाळे तिथे आले.आरोपींनी रेमश शेंगाळे यांना देखील मारहाण केली. पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र हिले करीत आहेत.