काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी नवा फॉर्म्युला ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीनंतर देशभरात मोठ्या प्रमाणात उलथापालथ सुरु झाली. लोकसभेतील मानहानीकारक पराभवानंतर काँग्रेसमध्ये तर राजीनाम्याचे सत्र सुरु झाले असून विविध राज्यातील प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे दिले आहेत. या सगळ्यांबरोबरच आणखी एक धक्कादायक राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढे केला होता. मात्र केंद्रीय कमिटीने हा राजीनामा मंजूर केला नाही.

त्यामुळे पुन्हा एकदा यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. आता मात्र काँग्रेसच्या केंद्रीय समितीने यावर तोडगा काढल्याचे समजत आहे. राहुल गांधी हे आपल्या राजीनाम्यावर ठाम असल्याने ते निर्णय बदलणार नसल्याचे समजत आहे. त्यामुळे आता पुढचा अध्यक्ष निवडला जाईपर्यंत राहुल गांधी या पदावर राहणार आहेत. यासाठी नवीन फॉर्म्युला तयार केला गेला आहे. यात एक अध्यक्ष आणि चार कार्यकारी अध्यक्ष असतील.

तर चार कार्यकारी अध्यक्ष देशभरात फिरून पक्षाच्या प्रचार-प्रसाराचं काम पाहतील. मनमोहनसिंग यांच्याकडे अध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय सध्या कॅप्टन अमरिंदरसिंग, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, शशी थरूर, ए. के. अँटनी यांची नावं अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस बरोबरच त्यांच्या मित्रपक्षांना देखील मोठ्या प्रमाणात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे पक्षातील अनेक छोटे- मोठे नेते रामराम करण्याच्या तयारीत आहेत. त्यात राहुल गांधींचा झालेला अमेठीत पराभव तसेच मोठ्या नेत्यांचा झालेला पराभव यामुळे काँग्रेसने पक्ष सुधारणेसाठी मोठी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

You might also like