मनसुख हिरेन प्रकरण ! मनसेच्या ‘त्या’ गंभीर आरोपावर संजय राऊत यांनी बोलणं टाळलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेत ठाणे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव समोर आले आहे. तर या प्रकरणावर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी केलेल्या सचिन वांझे यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी बोलण्याचे टाळले आहे.

दरम्यान, या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार याचबरोबर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विटरद्वारे सचिन वाझेंवर गंभीर आरोप केले आहेत. संदीप देशपांडे यांनी सचिन वाझेंचं शिवसेना कनेक्शन समोर आणलं आहे. सचिन वाझे यांनी २००८ साली शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे ह्या प्रकरणाचे गूढ अधिकच वाढले आहे.सर्व महत्वाच्या केसेस या त्यांच्याकडेच का सोपवल्या जातात? तसेच शिवसेनेचे मुख्यमंत्री झाल्यावर सचिन वाझे पुन्हा शासकीय सेवेत कसे रुजू होतात असा सवाल देशपांडे यांनी मांडला आहे.

संदीप देशपांडे यांनी केलेल्या आरोपावरून पत्रकारांनी संजय राऊत याना विचारलं असता याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर मनसुख हिरेन यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार याबद्दलचं सत्य चौकशीतून समोर येईल. अंबानी यांच्या घराबाहेर आढळून आलेल्या गाडीचे मालक आणि या प्रकरणातील महत्त्वाचे साक्षीदार हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू होणं अतिशय धक्कादायक आहे. हा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे देण्यात आला आहे. या पथकात अनेक नावाजलेले पोलीस अधिकारी असून, ते सत्य शोधून काढतील, असे त्यांनी सांगितलं आहे. तसेच या प्रकरणी सत्य जितक्या लवकर बाहेर येईल, तितकं सरकारच्या प्रतिष्ठेसाठी योग्य असेल. निरपराध व्यक्तीच्या मृत्यूचं विरोधकांनी भांडवल करू नये, असे राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.