धक्कादायक ! उपचाराच्या नावाखील तरुणीला तोंडात चप्पल घेऊन गावात फिरवलं

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांपासून शारिरीक व्यांधीनी त्रस्त असलेल्या तरुणीला औषधांचा फरक पडत नसल्याने एका तांत्रिकाला बोलावण्यात आहे. तांत्रिकाने उपचाराच्या नावाखाली पीडित तरुणीला तोंडात चप्पल घालून गावात फिरवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावात शनिवारी (दि.18) घडल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात माहिती मिळताच महाराष्ट्र अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीच्या पथकाने रविवारी (दि.19) या तरुणीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांचे प्रबोधन केले.

पीडीत तरुणी ही शारिरीक व्याधींनी ग्रस्त होती. कुटुंबातील सदस्यांनी तिच्यावर अनेक औषध उपाचर केले. मात्र, काही फरक पडत नसल्याने मुलीला भूत-प्रेताची बाधा असल्याचे नातेवईकांनी सूचवले. नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार धास्तावलेल्या मुलीच्या वडिलांनी यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील मांत्रिकास बोलावून घेतले. मांत्रिकाने मुलीच्या तोंडात पायातील चप्पल धरायला सांगून गावातून व गावाच्या आजूबाजूच्या परिरातून फिरवले. या मांत्रिकाने मुलीच्या अंगात 6 भूतं असून 4 भूतं-प्रतांना काढल्याचे सांगितले. तसेच यासाठी मुलीच्या घरच्यांकडून मोठी रक्कम उकळली.

मुलीवर उपचार बाकी असून मांत्रिक पुन्हा येणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा कार्याध्यक्ष प्रल्हाद बोहाडे आणि जिल्हा प्रधान सचिव अशोक तायडे यांना मिळाल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डिगंबर कट्यारे यांच्या सूचनेनुसार शेंगोळा येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली. तसेच यापुढे मांत्रिकाकडून उपचार करून घेऊ नका असा सल्ला देत कुटुंबाची समजूत काढली. दरम्यान, पोलिसांनी मांत्रिकाचा शोध घेऊन त्याच्यावर जादूटोणा विरोधी कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र अनिसने केली आहे.