ज्योतिषशास्त्राची खोटी जाहिरात देऊन महिलेची फसवणूक, उच्च शिक्षित आरोपी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – युट्युबवर ज्योतिषशास्त्राची खोटी जाहिरात टाकून महिलेला लाख रूपयांचा गंडा घालणाऱ्या राजस्थानी तरुणाला सायबर सेलकडून अटक करण्यात आली आहे. आरोपीला सायबर सेलच्या पथकाने राजस्थान येथून अटक केली आहे. आरोपी उच्च शिक्षित असून त्याने युट्युब आणि सोशल मीडियावर ज्योतिष शास्त्राविषयी जाहीरात देऊन महिलेची 1 लाख सहा हजार रुपयांची फसवणूक केली होती.

कोंढवा येथे राहणाऱ्या महिलेने युट्युब आणि सोशल मीडियावरील ज्योतिषशास्त्राची जाहिरात पाहून त्यामध्ये दिलेल्या मोबाईवर संपर्क साधला. या महिलेच्या घरामध्ये सतत भांडणं होत असल्याने त्या महिलेने संपर्क साधला असता आरोपीने मोहम्मद अली असे आपले खोटे नाव सांगितले. महिलेने कुटुंबातील अडचणी सांगितल्या असता त्याने तुमच्यावर काळी जादू करण्यात आली असल्याचे सांगितले. यावर उपाय करण्यासाठी त्याने महिलेकडून वेळोवेळी पैसे घेतले. पैसे देऊनही फरक पडत नसल्याने महिलेने पुणे सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तांत्रिक बाबी पडताळून पाहिल्या असता आरोपी राजस्थानमध्ये बसून महिलांची फसवणूक करत असल्याचे निष्पन्न झाले. सायबर क्राईमच्या पथकाने राजस्थान येथे जाऊन आरोपी शुभम सेतीया (वय-21) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान आरोपीने देशातील 30 ते 40 नागरिकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला अटक करून गुन्ह्यात वापरलेले दोन मोबाईल आणि 1 लाख 6 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रविंद्र गवारी, पोलीस कर्मचारी अस्लम अत्तार, शिरीष गावडे, हर्षल दुसाने, शुभांगी मालुसरे यांच्या पथकाने केली.