मराठा क्रांती मोर्चा संवाद यात्रा धुळ्यात पोहचली

धुळे : पोलीसनामा आॅनलाइन – मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मुख्य मागणीसह अन्य २० मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे काढण्यात आलेली उत्तर महाराष्ट्र विभागीय संवाद यात्रा दाखल झाल्यानंतर यात्रेचे साक्री शहरात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संवाद रथाची शहरातल्या रस्त्यावरुन भगवा ध्वजधारी मराठा समाजातील युवकांसमवेत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी वाचनालयातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शीतल सनेर व विकास सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक : खा. सुप्रिया सुळे 

त्यानंतर शासकीय विश्रामगृहात सभा घेण्यात आली. याप्रसंगी संवाद यात्रा रथाचे सारथी प्रकाश कदम व सुभाष माने यांचे प्राचार्य बी.एम.भामरे व पी.झेड.कुवर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख विशाल देसले, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक नांद्रे, तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, उपाध्यक्ष डॉ.विपीन पवार, प्राचार्य बी. एम. भामरे, प्राचार्य पी.एस.सोनवणे व पी.झेड.कुवर, सचिव डॉ.सचिन नांद्रे, अनिल अहिरे, धनंजय सोनवणे, नरेश शेवाळे, तालुका संघटक शीतल सनेर, जितेंद्र अहिरराव, विकास सोनवणे, राकेश पाटील, प्रवीण पाटील, बंटी सोनवणे, तुषार देसले, क्रांती मोर्चाच्या साक्री तालुका कोअर कमिटीचे पदाधिकारी आबा सोनवणे, जितेंद्र मराठे, किशोर वाघ, जगदीश शिंदे, सचिन देसले, जितेंद्र सोनवणे, निस्वार्थी मराठा ग्रुपचे युवक आदींसह मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी प्रा. बी. एम. भामरे म्हणाले, गेल्या दीड वर्षापूर्वी १३ जुलै २०१६ रोजी कोपर्डी येथील अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन नराधमांनी केलेल्या अत्याचार व अमानूष खुनानंतर राज्यभरातील तमाम मराठा समाज एकवटला व खुनी अत्याचाऱ्यांना फाशी व्हावी. यासह इतर मागण्या करण्यात आल्या. राज्यात गेल्या दीड वर्षात लाखोंच्या संख्येत ५२ मोर्चे निघाले. जे जागतिक पातळीवर लक्षवेधी ठरले. एवढे शक्ती प्रदर्शन करुनही शासन या मराठा समाजाच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. गेल्या १६ नोव्हेंबरपासून निघालेली ही संवाद यात्रा २६ नोव्हेंबर रोजी विधानभवनावर धडकणार आहे.
याप्रसंगी आबा सोनवणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.विपीन पवार यांनी प्रास्ताविक केले. पी.झेड.कुवर यांनी आभार मानले. यात्रा पिंपळनेरकडे मार्गस्थ झाली. यशस्वीतेसाठी म.सेवा संघाचे व मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

दूध लिटर मागे ५ रुपयांनी महागणार ? 
टायर फुटल्याने तवेरा पाण्यात बुडून ४ जणींचा मृत्यु