शशिकांत शिंदे मराठा आहेत का? नरेंद्र पाटलांचा प्रश्न, आमदारांनी दिलं चोख प्रत्युत्तर; म्हणाले…

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षण कायदा सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे. यावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक जुंपले आहेत. यातच आता अण्णासाहेब महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. या वादामुळे भाजप आणि राष्ट्रवादी आमने सामने आले आहेत. आमदार शशिकांत शिंदे हे नक्की मराठा आहेत का ? असा प्रश्न केला आहे.

न्यायालयाच्या निर्णयावरून साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दोन युवकांनी हल्ला केला आणि तोडफोड केली. त्याचा जाब विचारण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे हे त्या दोन तरुणांच्या घरी पोहोचले आणि त्यांना इशारा दिला. असा video प्रसारित झाल्यानंतर आज नरेंद्र पाटील साताऱ्यामध्ये दाखल होताच शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. तर म्हणून, ज्या तरुणांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयाची तोडफोड केली त्यांच्या मागे एक समाज म्हणून खंबीरपणे उभा असल्याचं देखील पाटील यांनी म्हटले आहे. तसेच, आमदार शिंदे यांनी केलेल्या दमबाजी प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करावा आणि त्या युवकाच्या परिवाराला पोलीस संरक्षण देण्याची मागणी नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

पाटील यांच्या विधानावरून, शशिकांत शिंदे म्हणाले, पाटील यांच्या टीकेला आपण महत्व देत नाही. मी कुणालाही दम दिला नाही. तर समजावून सांगण्यासाठी गेलो होते. मी मराठा आहे हे मलाही माहिती आहे आणि समाजातील सर्व नेत्यांनाही माहिती आहे, असे प्रत्युत्तर आमदार शिंदे यांनी दिल आहे. या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी दगड फेक केल्याची घटना घडली आहे. गाडीतून आलेल्या व्यक्तीं दगडफेक करुन फरार झाल्या आहेत. सातारा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे. आमदार शिंदे यांनी भाजपच्या काही मंडळींनी हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. भाजपची काही मंडळी जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तो प्रकार सातारामध्ये झाला आहे.