मराठी चित्रपट निर्माते अशोक म्हात्रे यांचे निधन

कल्याण : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मराठी चित्रपटांचे निर्माते अशोक म्हात्रे (वय 69) यांचे मंगळवारी (दि. 6) निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. ते डोंबिवली येथील पाथर्लीचे रहिवासी होते. म्हात्रे हे शांतीनगर विद्यालयाचे संस्थापकीय अध्यक्ष होते. तसेच डोंबिवलीतील आखिल भारतीय आगरी महोत्सवाचे ते सल्लागारही होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

म्हात्रे यांनी ‘शपथ तुला बाळाची’ या मराठी चित्रपटाची निर्मिती 1989 साली केली होती. हा चित्रपट सामाजिक होता. त्यांचा हा चित्रपट चांगला नावाजला गेला. त्यामुळे त्यांचे नाव मराठी चित्रपट सृष्टीत आदराने घेतले जाऊ लागले. त्यानंतर त्यांनी ‘मुक्ता’ या जातीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.

म्हात्रे यांचा ‘मुक्ता’ हा चित्रपट हा मराठी चित्रपट सृष्टीतील मैलाचा दगड मानला जातो. म्हात्रे यांच्या चित्रपट निर्मितीमुळे डोंबिवलीचे नाव चित्रपट सृष्टीत झळकले होते. साता समुद्रापार त्यांच्या नावाचा लौकीक पसरला होता.