‘त्या’ कंजारभाट तरुणांचा पोलीस बंदोबस्तात विवाह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

जात पंचायतीच्या ठरवून दिलेल्या प्रथेला बाजूला सारुन कंजारभाट समाजातील एश्वर्य़ा आणि विवेक यांचा विवाह सोहळा शनिवारी (दि.१२) सायंकाळी सात वाजता पोलीस बंदोबस्तात पार पडला. कौमर्य चाचणीच्या प्रथेला विरोध करणा-या जोडप्याच्या विवाहाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. काळेवाडी, विजयनगर येथील बालाजी लॉन्समध्ये हा विवाह सोहळा पार पडला.

एश्वर्य़ा आणि विवेक या जोडप्याने कौमार्य चाचणीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता. कंजारभाट समाजातील या जोडप्याने एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालून या समाजातील अनिष्ठ प्रथांना धुडकावून लावून विवाह केला. या विवाह सोहळ्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर नव दांपत्याच्या स्टेजजवळ बाऊन्सरचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. स्टॉप दि व्ही रिच्युअल अर्थात जात पंचायत , कुप्रथाविरुद्ध लढा या संस्थेच्या पुढाकाराने या विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते.
या विवाह सोहळ्यास विधान परिषद सदस्या डॉ नीलम गोऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, स्टॉप दि व्ही रिच्युअल अर्थात जात पंचायत आणि कौमार्य चाचणी प्रथेविरुद्धचा लढा देणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते कृष्ण इंद्रिकर, केतन घमंडे, भारत तामयचीकर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

सहा महिन्यांपासून कौमार्य चाचणीविरुद्ध आवाज उठवण्यात आला होती. स्टॉप दि व्ही रिच्युअल अर्थात जात पंचायत, कुप्रथाविरुद्ध लढा या संस्थेकडून या चाचणीला तीव्र विरोध करण्यात आला होता. या चाचणीविरुद्ध समाजातील अनेक तरुण-तरुणींनी एकत्र येऊन लढा उभारला होता. या तरुणांना समाजाविरुद्ध काम करु नये यासाठी धमकावण्यात आले होते. मात्र एश्वर्य़ा आणि विवेक या जोडप्याने या धमक्यांना न घाबरता आपला लढा सुरु ठेवून विवाह केला. किरण सत्यासिंह तमायचिकर यांचे चिरंजीव विवेक तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर कावीचंद भाट यांची नात यांच्या या विवाह सोहळ्याला समाजबांधवापेक्षा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.