शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंवर ४२० चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही : मनसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर युतीवर सर्वांनीच टीका केली. तसंच शिवसेनेची सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. सर्व विरोधकांनी शिवसेना-भाजपच्या युतीवर टीका केली. तर मनसे मागे कसे राहील. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. देशपांडे यांनी केलेल्या टिकेमुळे पुन्हा एकदा शिवसेना-मनसे यांचा वाद पेटण्याची शक्यता आहे.

शिवसैनिकांनी उद्धव साहेबांवर ४२० चा गुन्हा दाखल करायला हरकत नाही. तो न्यायालयात सुद्धा टिकेल, असं मला मूळचा शिवसैनिक असलेला वकील सांगत होता, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केली आहे. शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाल्याच्या काही तासांनंतरही संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले होते. त्यानंतर सोशल मीडियावर या ट्वीटची चर्चा रंगली आहे.

अफझल खानाच्या साक्षीने प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने शरयू आणि चंद्रभागेच्या स्नाना मुळे युती मीठी नदीकाठी पवित्र झाली. आता पहिले सरकार फिर मंदिर जय श्रीराम, असं ट्वीट देशपांडे यांनी केलं. त्याला #लाचारसेना असं हॅशटॅगही त्यांनी दिलं आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप युतीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ४८ लोकसभा मतदारसंघ आहेत. यापैकी शिवसेना २३ आणि भाजप २५ जागांवर लढणार आहे, असा फॉर्म्युला ठरला आहे. तर विधानसभेत मित्रपक्षांना जागावाटप केल्यावर उरलेल्या जागांमध्ये समांतर जागावाटप केले जाणार आहे.