Maval Lok Sabha | मावळ लोकसभा मतदार संघातील मविआचा उमेदवार ठरला, पण महायुतीत रस्सीखेच सुरूच

पिंपरी : Maval Lok Sabha | पुण्यातील मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) उमेदवार ठरला आहे. येथून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे (Sanjog Waghere Patil) यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केली आहे. येथे उमेदवारी जाहीर करून महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी दुसरीकडे महायुतीमध्ये दावे-प्रतिदावे, रस्सीखेच सुरूच असल्याचे दिसत आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघावर भाजप (BJP), अजित पवार गट दावा करत आहेत. खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) आपणच महायुतीचा उमेदवार असल्याचे सांगत आहेत. भाजपचे बाळा भेगडेही (Bala Bhegade) येथून इच्छुक आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांचा शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध आहे.

दरम्यान, भाजपाने दोन्ही गटांच्या उमेदवारांना कमळावर लढण्याचा आग्रह धरला असल्याने अनेक ठिकाणी उमेदवारीचा निर्णय होऊ शकलेला नाही. मावळमध्ये सुद्धा चिन्ह भाजपचे आणि उमेदवार शिवसेनेचा असू शकतो, अशी चर्चा आहे. अशा प्रकारे महायुतीमध्ये मावळच्या जागेवरून घोळ सुरू असताना. तिकडे महाविकास आघाडीच्या संजोग वाघेरे यांनी आपल्या प्रचाराला सुद्धा सुरूवात केली आहे.

महाविकास आघाडीचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी म्हटले आहे की, विरोधक कमळाच्या चिन्हावर लढल्यास उलट निवडणूक सोपी होईल. कारण भाजपच्या विरोधात सुप्त लाट असून मला फायदा होईल.

वाघेरे यांनी विजयाची वाट सोपी असल्याचे म्हटले असले तरी प्रत्यक्षात ग्राउंड स्थिती वेगळी असल्याचे बोलले जात आहे. कारण, वाघेरे यांच्या प्रचारात राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेसचे पदाधिकारी त्यांच्यासोबत दिसत नाहीत.

प्रचाराला सुरुवात करताना ठाकरे गटाचे माजी आमदारही वाघेरे यांच्या सोबत दिसले नाहीत. वाघेरे यांच्या सोबत जुन्या पक्षातील सहकारीच दिसून येत आहेत. तसेच ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील खासगीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, पुढील आठवड्यात महायुतीत मावळ मतदारसंघातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुणे : डिलेव्हरी बॉयला लुटून परिसरातील वाहनांची तोडफोड, दहशत पसरवणाऱ्या चार जणांवर FIR (Video)