Coronavirus : आता ‘संगीता’च्या मदतीनं ‘कोरोना’चे रुग्ण बरे होतील ! भारतातील ‘या’ रुग्णालयानं सुरु केला ‘प्रयोग’

मेरठ :  वृत्तसंस्था –   जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून अद्याप कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध झालेले नाही. जगभरातील अनेक देश कोरोनाविरोधात लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, भारतातील उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या रुग्णांवर वेगळ्या पद्धतीने उपचार करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील एका रुग्णालयात कोविड 19 वार्डात संगीत वाजवले जात आहे. यामुळे कोरोनाचे रुग्ण खूप खूश असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेडिकल कॉलेज रुग्णालयात कोरोना रुग्णांची मानसिक स्वास्थ्य चांगली राहण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. कोविड 19 वॉर्डमध्ये हळू आवाजात दिवसातून तीनवेळा गाणी वाजवली जातात. त्यामुळे कोरोनाचे रुग्ण उत्साही दिसत आहेत. कोरोना वॉर्डमधील डॉक्टरांचे म्हणणे आहे की, भविष्यात रागांवर आधारित उपचार सुरु केले जातील.
कोविड वॉर्डचे प्रभारी डॉक्टर सुधीर राठी यांनी सांगितले की, रुग्णांना बरे करण्यात संगीत चिकित्सा ही मोठी भूमिका बजावत आहेत. कारण यामुळे रुग्णांचा आत्मविश्वास वाढतो. कोरोना वॉर्डात अनेक सकारात्मक पावलं उचलली जात आहेत. लखनौहून आलेल्या डॉ. वेद प्रकाश यांच्या सूचनेनंतर कोरोना वॉर्डमध्ये हळू आवाजात संगीत वाजवण्यास सुरवात झाली. यामुळे कोरोनाचे रुग्ण उत्साही आणि खूष असून त्यांनी या थेरेपीचे कौतुक केले आहे. यामुळे कोरोना रुग्णांचे मनोरजंन तर होतच आहे याशिवाय त्यांच्यामध्ये सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.

डान्स करताना दिसले रुग्ण

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मेरठ मधील असून मेरठमधील कोविड -19 रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण डान्स करताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी 85 वर्षीय वृद्ध महिला कोरोनावर मात करून घरी परतली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांमध्ये आत्मविश्वास वाढत आहे. सोशल मीडियावर 39 सेकंदाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या 39 सेकंदाच्या एक व्हिडिओ मध्ये गाणे वाजत असून त्याच्या तालावर अनेक रुग्ण नाचताना दिसत आहेत. दरम्यान, मेरठमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून या ठिकाणी 341 कोरोनाचे रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 20 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मेरठमध्ये 146 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.