CM उद्धव ठाकरे, सुधीर मुनगंटीवार यांच्यात बंद दाराआड बैठक, राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे सुधीर मुनगंटीवार हे गेल्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीवर सरकारवर टीका करत होते. खरतर ते शिवसेनेवर निशाणा साधत होते. मात्र, मंगळवारी त्यांनी अचानक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत त्यांच्यात जवळपास १५ ते २० मिनिटे बंद दाराआड बैठक पार पडली. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. या अचानक झालेल्या भेटीनं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

आगामी अर्थसंकल्प, भाजपमधल्या घडामोडी, मतदारसंघातल्या प्रश्नांवर या बैठकीत चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर फडणवीस सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं होतं. तसेच आता काहीच दिवसांत राज्याचा अर्थसंकल्प सादर करायचा आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली असावी, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

बैठक संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, आजची बैठक ही माझ्या मतदार संघातील अनेक समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांना राजकीय अर्थ काढायचा आहे, त्यांना काढू द्या. जर काही झालंच तर चांगलंच होईल की. पुढे म्हणाले, की, सध्या निवडणुका समोर ठेऊन काही राज्यांना निधी देण्यात आला आहे, असा आरोप केला जातोय. यामध्ये मी एक बाब स्पष्ट करतो की, केवळ त्या राज्यांची नावं घोषित करण्यात आली. परंतु त्यांच्यापेक्षा जास्त निधी हा महाराष्ट्राला मिळाला आहे. असे मुनगंटीवार यांनी सांगितले.