देवेंद्र फडणवीसांसोबतच्या भेटीत काय झालं? शिवसेनेच्या ‘या’ दिग्गज मंत्र्यानं पहाटेची आठवण काढत सांगितलं सगळं

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – एकीकडे कोरोनाच्या महामारीत लोक अडकलेले आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक आरोपप्रत्यारोप करताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चक्री वादळाची पाहणीदरम्यान रत्नागिरी दौऱ्यावर होते त्यावेळी मंत्री उदय सामंत यांनी त्यांची भेट घेतली. यावरून फडणवीसजी जेव्हा वादळाची पाहणी करायला कोकणात आले. रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत व त्यांचे बंधू त्यांना भेटायला तडफडत होते. दोघेही कसेतरी साहेबांच्या रूमपर्यंत पोहचले. आणि देवेंद्रजींची इच्छा नसतानाही त्यांना भेटले, असा आरोप भाजपचे निलेश राणेंनी ट्विटवर केला आहे.

निलेश राणेंच्या या आरोपावरून शिवसेना नेते आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मंत्री सामंत पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, मी रत्नागिरीतील शासकीय विश्रामगृहात होतो. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तिथे आले. त्यांचं जिल्ह्यात स्वागत करण्यासाठी मी तिथे पोहोचलो. त्यावेळी तिथे शिवसेना, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. ही भेट गुप्त नव्हती. ती दिवसाढवळ्या झाली. ही घटना काही पहाटेच्या शपथविधीसारखी नव्हती. अंधारात झाली आणि मग इतरांना कळली, असं याबाबतीत झालं नाही, असा उपरोधिक टोला देखील उदय सामंत यांनी लगावला आहे. तर २०० लोकांसोबतची बैठक गुप्त कशी काय असू शकते?, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे, असे सामंत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते मला वरिष्ठ आहेत. त्यामुळेच मी त्यांच्या स्वागताला पोहोचलो. यात राजकारण नाही. ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. आरोप आणि दावे कोण करतो त्यावर अवलंबून असतं. ज्यांना जिल्ह्याचं राजकारण जमत नाही, २ जिल्हे सांभाळता येत नाहीत, त्यांच्यावर मी कशाला बोलावं, असे सामंत यांनी राणेंवर निशाणा साधला. या दरम्यान, विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी घेणं, त्यांचा आदर करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. परंतु, ज्यांना ही संस्कृतीच समजत नाही, अशा लोकांना देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासारखे नेते सोबत घेणार असतील, तर भविष्यातलं राजकारण काय असेल याची त्यांनी कल्पना करावी, असे देखील सामंत यांनी म्हटले आहे.