COVID-19 : ‘कोरोना’ व्हायरसच्या विरूध्द भारताच्या प्रयत्नाचं केलं ‘कौतुक’ तर अमेरिकेत दाखल झाला FIR

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या न्यू जर्सी येथे राहणाऱ्या तेलंगणामधील एका अनिवासी भारतीय महिलेविरूद्ध अमेरिकेविरोधी वक्तव्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेलगू एनआरआय स्वाती देवीनेनी यांनी कोरोना विषाणूवर अंकुश ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नांचे कौतुक करत एका व्हिडिओच्या माध्यमातून ट्विट केले होते. ज्याला अमेरिकन सरकारने देशविरोधी ठरवत कारवाई केली आहे. या ट्विटमधील व्हिडिओत स्वाती देवीनेनी यांनी म्हटले आहे की अमेरिकेसारखा शक्तिशाली देश कोरोना विषाणू या साथीच्या रोगास रोखण्यात अपयशी ठरला आहे, मात्र भारताने त्यावर मात केली आहे.

व्हिडिओमध्ये देवीनेनी म्हणते, ‘अमेरिका चांगली आरोग्य सुविधा असलेला संपन्न देश आहे. असे असूनही अमेरिकेला कोरोना विषाणूचा सामना करता आला नाही. तथापि, या रोगाबद्दल भारताने पूर्वीपासूनच बर्‍याच गोष्टी समजून घेतल्या, ज्यामुळे त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला नाही. माझा भारत महान.’ स्वातीचा हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेलगू लोकांनीही यावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केली. यानंतर सोशल मीडियावर स्वाती देवीनेनीही या व्हिडिओबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

माजी न्यूज सादरकर्ता राहिलेल्या स्वाती यांनी स्पष्टीकरण देताना ट्विट केले आहे की, ‘भारताच्या तुलनेत अमेरिकेला कमी लेखण्याचा माझा हेतू नव्हता. मी फक्त माझ्या मातृभूमीचे कौतुक केले होते, की कोविड -19 साथीच्या रोगाचा भारत कसा सामना करीत आहे. या गोष्टी माझ्या स्वत:च्या नव्हत्या. मी हे इतरत्र वाचले आहे, जे आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये आहे.’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

देवीनेनी म्हणाल्या की कोणीतरी हा व्हिडिओ डाउनलोड केला आणि त्यांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर पोस्ट केला. स्वाती देवीनेनी तेलंगणाच्या खम्मम जिल्ह्यातील आहेत. वर्षभरापूर्वी ती आपल्या पतीसह अमेरिकेत शिफ्ट झाली आहे आणि तेलगू माध्यमात काम करते. तर तिचे पती सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत.