#MeToo : मुलींना न्याय नाही प्रसिद्धी हवी : पल्लवी जोशी 

वृत्तसंस्था : अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने #MeToo अंतर्गत अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर आरोप केल्यानंतर एकच खळबळ माजली. त्यानंतर अशा अनेक घटना समोर येऊ लागल्या पण #MeToo चळवळीतील काही तुरळक घटना वगळता इतर सर्वांना न्याय नको असून प्रसिद्धी हवी आहे असं मत अभिनेत्री पल्लवी जोशी हिने व्यक्त केलं आहे. ज्यांना खरंच न्याय हवा आहे त्या महिला मात्र तोंड उघडायला ही बिचकत आहेत अशी खंतही तिने व्यक्त केली आहे.

तनुश्री दत्ताने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी मला कपडे काढून डान्स करायचा आग्रह केला असा आरोप केला होता. विवेक अग्निहोत्री पल्लवी जोशीचे पती आहेत. नुकताच राजकुमार हिराणी यांच्यावरही एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला. याबद्दल बोलताना पल्लवी जोशी म्हणाली,’ हिराणींवर आरोप झाले तेव्हा मला धक्काच बसला. आज #MeToo तून होणारे आरोप वाचून खंत वाटते. यातील किती आरोप लैंगिक शोषणाचे आहेत.

उत्तर भारतात महिलांना गावोगावी घरात डांबलं जातं. त्यांचा लैंगिक छळ केला जातो. घरातलेच सदस्य लैंगिक शोषण करतात. पण त्या महिला आपल्या त्रासाबद्दल बोलू शकत नाही. दुसरीकडे कॉर्पोरेटमध्ये एखाद्या पुरुषाने तुम्हाला सुंदर म्हटलं तर महिलांना चालतं. पण त्याने फक्त छातीकडे पाहिलं की ते लैंगिक शोषण कसं काय होऊ शकतं. छातीकडे बघणं योग्य नाही पण त्याला लैंगिक शोषण म्हणता येईल का ? त्यामुळेच मीटूमधून व्यक्त होणाऱ्या महिलांना प्रसिद्धी हवी आहे’

यासोबतच तिने या महिलांवर ताशेरे ओढताना त्या आरोपी मुलांच्या कुटुंबाचा विचार करत नाहीत असंही म्हटलं. ‘तुम्हाला खरंच न्याय हवा असेल तर तुम्ही पोलीस आणि कोर्टाकडे का जात नाही ?’ असा प्रश्नही तिने विचारला. अर्थात यातील काही आरोप खरे असतील या मतास ही तिने दुजोरा दिला आहे. फक्त प्रसिद्धीसाठी पुरुषांना बदनाम करणाऱ्या महिलांची मला लाज वाटते असं मतही तिने व्यक्त केलं आहे.