#MeToo: सिम्बायोसिसचे २ प्राध्यापक निलंबित

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – मी टू मोहिमेचा जोरदार दणका प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या पुण्यातील सिम्बायोसिसला बसला आहे. काही दिवसांपूर्वी मी टू मोहिमेंतर्गत विद्यार्थिनींनी लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली होती. याची दखल घेऊन सिंबायोसिस अभिमत आंतरराष्ट्रीय विद्यापीठाने विमाननगर येथील सिम्बायोसिस सेंटर फॉर मीडिया अँड कम्युनिकेशनमधील (एससीएमसी) विजय शेलार व सुहास गटणे या दोन प्राध्यापकांना निलंबित केले आहे. अंतर्गत तक्रार समितीच्या अहवालावरून ही कारवाई केली आहे.

देशात मी टू चळवळीने जोर धरल्यानंतर सिंबायोसिसमधील एससीएमसीमधील माजी विद्यार्थिनींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याबाबत घडलेले गैरप्रकार उघड केले होते. यामुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये प्राध्यापकांबरोबरच काही विद्यार्थ्यांवरही आरोप करण्यात आले होते. सिंबायोसिस प्रशासनाने याची दखल घेऊन अंतर्गत तक्रार समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती. तसेच, विजय शेलार व सुहास गटणे या दोन प्राध्यापकांसह एससीएमसीचे संचालक अनुपम सिद्धार्थ यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. याच काळात संस्थेच्या शंभरहून अधिक विद्यार्थिनींनी अनुपम सिद्धार्थ यांच्या गैरवर्तणुकीविषयी लेखी तक्रार दिली होती; तसेच सिद्धार्थ यांना या पदावरून हटवावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार सिद्धार्थ यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून शेलार व गटणे या प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.

अंतर्गत तक्रार समितीच्या अंतरिम अहवालानंतर दोन प्राध्यापकांवर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. समितीचा अंतिम अहवाल सादर झाल्यानंतर पुढील कारवाईबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे सिंबायोसिसच्या उपकुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी म्हटले आहे.
जाहिरात