योगी सरकार पाडण्यासाठी AIMIM च्या औवेसींनी केला तयार ‘हा’ प्लॅन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  बिहारमध्ये आपल्या पक्षाचा करिश्मा दाखवल्यानंतर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन(AIMIM) चे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांनी आता उत्तरप्रदेशकडे आपला मोर्चा वळवला आहे. औवेसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम-ओबीसी समीकरण एकत्र करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. यासाठी त्यांनी सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओम प्रकाश राजभर यांच्यासोबत हातमिळवणी केली असून, त्यांच्या साहाय्याने लहान-लहान घटकांना एकत्रित करुन मोठी राजकीय शक्ती निर्माण करण्याचे स्वप्न पाहत आहेत.

बुधवारी औवेसी यांनी लखनौ मध्ये ओम प्रकाश राजभर यांची भेट घेतली. नुकतेच राजभर यांनी ओबीसी समाजाच्या ७ संघटनांना एकत्र करत भाजपाविरुद्ध संकल्प मोर्चा नावाने आघाडी केली आहे. या आघाडीत ओम प्रकाश राजभर यांची हेलदेव भारतीय समाज पार्टी, बाबू सिंह कुशवाह यांची अधिकार पार्टी, कृष्णा पटेल यांची अपना दल, प्रेमचंद्र प्रजापती यांची भारतीय वंचित समाज पार्टी, अनिल चौहान यांची जनता क्रांती पार्टी आणि बाबू राम पाल यांची राष्ट्र उदय पार्टी या ओबीसी समाजासाठी कार्यरत असणाऱ्या पक्षांचा समावेश आहे.

राजभर यांच्यासोबत औवेसींनी बिहारमध्ये नशीब आजमावून पाहिले असल्याने एमआयएम या आघाडीत सामील होऊ शकते. औवेसी म्हणाले, ओम प्रकाश राजभर यांच्या नेतृत्वात उभे राहून काम करु, तसेच सपापासून वेगळे झालेले प्रगतशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल यादव यांच्यासोबत सुद्धा आघाडी करण्याचे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, औवेसी यावेळी ओबीसी-मुस्लिम समीकरण बनवून उत्तर प्रदेशच्या निवडणूकीत मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहेत.

उत्तर प्रदेशात ५२ टक्के ओबीसी मतदार

एका अंदाजानुसार, उत्तर प्रदेशात सर्वात जास्त म्हणजे ५२ टक्के मागासवर्गीय मतदार आहेत. त्यात ४२ टक्के मतदान गैर यादव बिरादरीच आहे, जो कोणत्याही पक्षाचा पारंपारिक मतदार नाही. तसेच मागासवर्गीय मतदार सामूहिकरीत्या कोणत्याही पक्षास मतदान करत नाही. या समाजाचे ५० टक्के मतदान ज्या पक्षास पडेल त्याची सत्ता राज्यात येते. २०१४, २०१९ च्या लोकसभा तर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत मागासवर्गीयांच्या पाठिंब्यावर भाजपने सत्ता मजबूत केली. २०१२ मध्ये सपा ओबीसी समाजाच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तेत आली. तर २००७ मध्ये मायावती यांनी दलितांसोबत मागासवर्गीयांना एकत्र करुन सत्ता मिळवली.