Mini Lockdown : संजय राऊत म्हणतात – ‘ती’ लोकच जगली नाहीतर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –   राज्यात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. त्यानंतर आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली. ‘जे लोकं सरकार निवडून देतात, तीच जगली नाही, तर राज्य आणि सरकार काय कामाचे? सरकाराने आनंदाने लॉकडाऊन लावला नाही, ही नामुष्की ओढवली आहे, असे ते म्हणाले.

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढला आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारकडून जी पावले उचलली आहेत त्यावर राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, ‘गुजरात हे महाराष्ट्राच्या शेजारील राज्य आहे, तेथे उच्च न्यायालयाने लॉकडाऊन करण्याचे निर्देश दिले आहेत. यावरुन जर लॉकडाऊन केला नाही तर परिस्थिती गंभीर आहे, हे लक्षात येते. मुख्यमंत्र्यांनी जनतेचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेतला आहे. तसेच यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेत्यांसह सर्वच पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा करुन लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे’.

ते पुढे म्हणाले, राजकारण करण्यासाठी उभा जन्म आपल्याकडे आहे. विरोधी पक्षातील नेतेमंडळींनी महाराष्ट्र सरकारच्या हातात हात घालून कोविडविरुद्धची लढाई लढायला हवी. सरकार येते आणि सरकार जातेही, पण जे लोकं सरकार निवडून देतात, तीच जगली नाही, तर राज्य आणि सरकार काय कामाचे?’