माझं नाव घेतल्याशिवाय ‘या’ 2 दिग्गज मंत्र्यांना झोप येत नाही – चंद्रकांत पाटील

चंदगड : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते विरूद्ध चंद्रकांत पाटील असा सामना रंगला आहे. मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री जयंत पाटील आणि अंकुश काकडे या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावरूनच चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर दिले होते. आता चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे. माझे नाव घेतल्याशिवाय मंत्री मुश्रीफ व जयंत पाटील यांना झोप येत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

चंदगड येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात चंद्रकांत पाटील बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करताना पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला असल्याने या मतदार संघात विजय खेचून आणण्याचा प्रयत्न महाआघाडीने चालविला आहे. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री जयंत पाटील यांनी कंबर कसली आहे. दिवसातून चारवेळा माझ्या नावाचा जप या लोकांनी सुरू ठेवला आहे. माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना रात्री झोप येत नाही, असे ते म्हणाले.

मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर आरोप करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, मराठा आरक्षण कुणी दिले आणि कुणी घालवले हे लोकांना माहिती आहे. आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात टिकवला, सुप्रित कोर्टात एक वर्ष हा प्रश्न टिकवून धरला होता. पण, महाआघाडीने सरकार आल्यानंतर आरक्षण टिकले नाही. हे कुणी केले हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत आमची भूमिका काय होती हे मुश्रीफ, अजित पवार व जयंत पाटील यांनी सांगू नये, अशी टिका त्यांनी केली. तसेच भाजपाचे पदवीधर व शिक्षकचे उमेदवार हे स्वच्छ चारित्र्य व लढवय्ये असल्याने नक्की निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, शिवाजीराव पाटील, सभापती अ‍ॅड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवणगेकर, माजी सभापती शांताराम पाटील, बबन देसाई, समृद्धी काणेकर, रत्नप्रभा देसाई, राम पाटील, संदीप नांदवडेकर, नितीन फाटक, भावकू गुरव, भरमू पाटील, सुनिल काणेकर उपस्थित होते.