Nawab Malik : ‘लोकशाही संपली असं जाहीर करा, अन्यथा चंद्रकांत पाटलांना न्यायालयाची माफी मागायला लावा’

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका करत ममता बॅनर्जीचे अभिनंदन केले होते. त्यावरून संतप्त झालेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भुजबळांना जामीनावर सुटला आहात असे म्हणत इशारा दिला होता. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. न्यायालयदेखील चंद्रकांतदादा पाटलांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असे जाहीर करा, नाहीतर पाटील यांना न्यायालयाची माफी मागायला लावा, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशा पद्धतीने बोलत असतील तर न्यायालयाने सुमोटो अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणीही मलिक यांनी केली आहे. आजपर्यंत भाजपकडून ईडी, सीबीआय, एनआयए आदी संस्थाचा दुरुपयोग करण्यात येत असल्याचे सिध्द झाले आहे. आता न्यायालयसुद्धा त्यांच्या बोलण्यावर काम करतेय का? असा सवालही मलिक यांनी केला आहे. भुजबळ यांचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परंतु पाटील यांच्या बोलण्याचा अर्थ काय आहे? अशी विचारणाही मलिकांनी केली आहे. दरम्यान भुजबळ यांनी पश्चिम बंगालच्या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जवळपास दिवसाआड सभा घेत होते. त्यांचे 8 ते 10 मंत्री मतदारसंघात ठाण मांडून बसले होते, तरीही उपयोग झाला नाही. देशात आता भाजपविरोधी लाट तयार झाल्याचा टोला भुजबळांनी लगावला होता. त्यावर पाटलांनी भुजबळांना थेट इशाराच दिला होता. तुम्ही जामिनावर सुटला आहात. तुम्ही काही निर्दोष सुटलेले नाही. त्यामुळे जास्त जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल, असे म्हणाले होते.