मिताली राजने घातली ‘या’ विश्वविक्रमाला गवसणी 

नेपियर : वृत्तसंस्था – भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट सामन्यात मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला संघाने गुरुवारी न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला. मुख्य म्हणजे या सामन्यात मितालीने फलंदाजी आणि गोलंदाजी न करताच एका विश्वविक्रमाला गवसणी घातल्याचे दिसून आले.
न्यूझीलंडने विजयासाठी ठेवलेले 193 धावांचे लक्ष्य जेमिमा रॉड्रीग्ज आणि स्मृती मानधना यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने सहज पार केले. महाराष्ट्राच्या पोरींच्या दमदार कामगिरीमुळे 2006 नंतर भारतीय महिलांनी प्रथमच न्यूझीलंड महिला संघावर न्यूझीलंडमध्ये विजय मिळवण्याचा पराक्रम केला. भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड दौऱ्याची विजयाने सुरुवात केल्याचे दिसून आले. भारताने हा सामना 9 विकेट राखून सहज जिंकला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
दरम्यान या सामन्यात मितालीने फलंदाजी आणि गोलंदाजी न करताच एक विश्वविक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात मितालीने सर्वात जास्त काळ आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या क्लेयर शिलिंगटनच्या नावावर होता, तिने 19 वर्षे 195 दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळले होते. हा विक्रम आता मितालीने माेडीत काढला आहे. मितालीला 19 वर्षे आणि 212 दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झाले आहेत. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा विश्वविक्रम मितालीच्या नावे झाला आहे.