‘या’ राज्यात एकही ‘कोरोना’चा रुग्ण नाही, तरी देखील ‘लॉकडाऊन’ 31 मे पर्यंत वाढवलं

आयझॉल : वृत्तसंस्था –  कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी मिझोरमने 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. गुरुवारी मिझोरममध्ये सरकारने अनेक राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था यांची बैठक घेतली. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला. यानंतर शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री झोरमथांग यांनी या निर्णय घेतला आहे.

मिझोरममध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. मात्र, लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. लॉकडाऊनच्या या टप्प्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्याचा निर्णयही राज्याने घेतला आहे.

7 मे रोजी देशातील लॉकडाऊन संपुष्टात येत आहे. अनेक राज्ये लॉकडाऊन पुढे वाढवण्याच्या बाजूनं आहेत. लॉकडाऊन पुढे वाढवण्यासाठी अनेक राज्यांनी केंद्र सरकारला शिफरस केली आहे. यामध्ये पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश या सारख्या अनेक राज्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लॉकडाऊन 4.0 वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

आसामची दोन आठवड्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस

आसामनेही केंद्र सरकारला 17 मे रोजी संपणारे लॉकडाऊन कमीत कमी दोन आठवड्यांनी वाढवण्याचे आवाहन केले आहे. याची पुष्टी करताना मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले की, आम्ही आमची लेखी शिफारस केंद्राकडे पाठविली आहे. आम्हाला सध्या लॉकडाऊन सुरु रहावे अशी आमची इच्छा आहे. मुख्यमंत्री म्हणाले की केंद्र सरकारने आमच्या शिफारशीवर विचार करायला हवा.