‘कोरोना’ स्थितीचा आढावा घेण्यासाठी रोहित पवार मैदानात, FB वर पोस्टद्वारे कार्यकर्त्यांना केलं ‘हे’ आवाहन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या संकटकाळातही अनेकजण घराबाहेर जाऊन कामाला प्राधान्य देत आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी हे तर खरे कोरोना योद्धे आहेत. मात्र, त्याचबरोबर लोकप्रतिनिधीही कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी मैदानात उतरत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक फेसबुकवर पोस्ट लिहित कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे.

‘शक्य तेवढी काळजी घेऊनच मी घराबाहेर पडतो. तुम्हीही घराबाहेर पडा अन कामाला सुरुवात करा. कारण आपल्यापुढे खूप मोठं आर्थिक संकट येऊन थांबलं आहे. भविष्यात ते आणखी कसं वळण घेईन हे कुणीही सांगू शकत नाही. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा… चुकूनही त्याकडे दुर्लक्ष करू नका. ती गोष्ट म्हणजे… तुम्ही जशी माझी काळजी करताय ना तशीच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.. तुम्ही एवढं जरी केलं तरी मला खूप आनंद होईल. माझ्या भावांनो आणि बहिणींनो,’ असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.

आमदार रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट
“गेल्या काही दिवसांपासून मला अनेक कार्यकर्त्यांनी फोन करून “दादा काळजी घ्या…, तुम्ही खूप लोकांमध्ये फिरता…” अशी विनंती केली. ट्विटर, फेसबुक, व्हाट्सएपच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक जण काळजी व्यक्त करत कोरोनाबाबत दक्षता घेण्यास सांगतात. या सर्वांचं अंतकरणापासूनचं हे प्रेम आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे. कोरोनाचं प्रमाण वाढतंय.. हे खरं आहे. पण म्हणून आपण घरात बसून चालणार नाही. मी वारंवार सांगतो की 55 वर्षांपुढील मंडळी, लहान मुलं, गर्भवती महिला भगिनी यांची विशेष काळजी घेऊन आपल्याला पुन्हा काम-धंदा सुरू करावा लागणार आहे. आपल्यातील अनेक बांधवांचं पोट हातावर आहे. त्यामुळं प्रत्येकानं आवश्यक ती दक्षता घेऊन काम सुरू करायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणूनच मीही लोकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी व ते सोडवण्यासाठी बाहेर पडलोय.

आता हेच पहा ना! डॉक्टर, नर्स, पोलीस, अँबुलन्स चालक, पॅरामेडिकल स्टाफ हे गेल्या तीन महिन्यांपासून दिवस-रात्र सेवा करतायेत. त्यांच्या या कामाचं कौतुक कितीही केलं तरी कमी आहे. म्हणून या कोरोना योध्यांना भेटण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कृतज्ञतेची थाप टाकण्यासाठी मी त्यांना भेटायला जात असतो. या कोरोना योध्यांना भेटून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करता येते, त्यांच्या अडचणी समजून घेता येतात, त्यातील शक्य त्या अडचणी लगेच सोडवण्याचा प्रयत्न करता येतो आणि आपल्या पाठीशी कुणीतरी खंबीरपणे उभं आहे, या भावनेने त्यांनाही काम करण्यास दुप्पट हुरूप येतो.

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे दररोज जिवाची लढाई असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या या कोरोना योध्यांना पाहून कोणत्याही कठीण प्रसंगात काम करण्याची ताकद मला मिळते. त्यासाठीच तर मी मुंबईत केईएम हॉस्पिटलसह इतरही कोविड केअर सेंटरला भेट दिली. पुण्यात ससून हॉस्पिटल, महापालिकेचं नायडू हॉस्पिटल व अन्य कोविड केअर सेंटरला भेट देऊन तिथल्या कोरोना योध्यांशी चर्चा केली. त्यांच्या अडचणी, त्यांचे अनुभव जाणून घेतले.

विशेष म्हणजे ,एकाही कोविड योध्यांने माझ्याकडं तक्रारीचा पाढा वाचला नाही. काही कमतरता असेल तर त्याची पूर्तता सरकारकडून लवकरच होईल, असा सकारात्मक आशावाद त्यांच्या बोलण्यातून जाणवला. हे सर्वजण अभावाचं भांडवल करत रडत बसणारे नाहीत तर आहे त्या साधनांच्या साह्याने लढणारे वीर आहेत. त्यांची ही जिद्द पाहून माझ्याच अंगावर मूठभर मांस आल्यासारखं वाटतं.

म्हणून शक्य तेवढी काळजी घेऊनच मी घराबाहेर पडतो. तुम्हीही घराबाहेर पडा आणि कामाला सुरुवात करा. कारण आपल्यापुढं खूप मोठं आर्थिक संकट येऊन थांबलंय. भविष्यात ते आणखी कसं वळण घेईन हे कुणीही सांगू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा… चुकूनही त्याकडं दुर्लक्ष करू नका ती गोष्ट म्हणजे… तुम्ही जशी माझी काळजी करताय ना तशीच स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.. तुम्ही एवढं जरी केलं तरी मला खूप आनंद होईल माझ्या भावांनो आणि बहिणींनो!

आपण काळजी घ्यायला कमी पडलो, तर नाईलाजपणे पुण्यासारखा लॉकडाऊनचा निर्णय घेण्याची वेळ येते. शेवटी हाही निर्णय आपल्या हितासाठी घेतला आहे. पण, कितीही नाही म्हटलं तरी यामुळं हातावर पोट असलेल्या वर्गाला फटका बसतो. पण, नाईलाज असतो. म्हणून आपण सगळ्यांनी अधिक जबाबदारीने योग्य काळजी घेतली तर कोणाला त्रास होणार नाही. आपल्या अर्थकारणाची गाडीही एका जागी रुतून बसणार नाही, असा विश्वास आहे,” असे रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like