गुन्हेगारांकडून भाजप आमदाराची पिस्तुल जप्त, प्रकरण दाबण्याचा पोलिसांचा प्रयत्न ‘फसला’

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – नांदेड शहरातील बाबानगर भागात 11 सप्टेंबर 2019 च्या रात्री पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यावेळी एका गुन्हेगाराकडून पिस्तूल जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. जप्त केलेली पिस्तुल मुंबई येथील फॉरेन्सीक लॅबमध्ये पाठवण्यात आली होती. त्यावेळी ही पिस्तुल मुखेडचे आमदार डॉ. तुषार राठोड यांची असल्याचे तपासणीत समोर आले. मात्र, याप्रकरणी पोलिसांनी आणि स्वत: आमदारांनी गोपनियता पाळून राजकीय दबाव टाकून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी आमदारांचा शस्त्र परवाना निलंबीत केल्याने हा प्रकार उघडकीस आला.

घटनेच्या दिवशी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाबानगर येथील सोमाणी हॉस्पिटलच्या समोर काही तरुण भांडण करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांना मिळाली. शिवाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाला त्या ठिकाणी पाठवण्यात आले होते. त्यावेळी पोलिसांनी दत्ता गजानन गायकवाड, आकाश डुबूकवाड, अजय मोरे यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींची अंगझडती घेतली त्यावेळी दत्ता गायकवाड याच्या ताब्यातून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली होती. तर आकाशकडून तलवार जप्त करुन तिघांवर गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी जप्त केलेले पिस्तुल फॉरेन्सीक लॅबकडे पाठवले होते. तपासणीत हे पिस्तुल मुखडचे भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांचे असल्याचे समजले. यावेळी पोलिसांनी गोपनियता पाळत आमदारांशी संपर्क साधला. त्यावेळी आमदरांना पिस्तुल चोरीला गेल्याचे माहित नसल्याचे सांगितले. यावेळी राजकीय दबाव वापरून हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न पोलीस आणि आमदार करत होते. मात्र, हा अहवाल जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्याकडे आला असता त्यांनी आमदार डॉ. राठोड यांनी शस्त्र वापरण्यास निष्काळजीपणा केल्यामुळे त्यांचा परवाना निलंबीत केला.

Visit : policenama.com