नागरिकांना लुटणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप

ठाणे : पोलीसनामा आॅनलाईन

दिवसेंदिवस शहरात तृतीयपंथीयांकडून नागरिकांना लुटल्याच्या घटनामध्ये वाढ होताना दिसत आहे. दिवसाढवळ्या देहविक्री आणि लुटमार करणाऱ्या तृतीयपंथीयाला मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. ठाण्याच्या माजिवडा भागात एका तरुणीला लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

येथील माजिवडा परिसरात नाशिक महामार्गाला लागून पाण्याच्या मोठ -मोठ्या पाईपलाईन आहेत. या पाईपलाईन जवळ असलेल्या झाडा-झुडपात तृतीयपंथी देहविक्रिचा व्यावसाय करत असल्याचा आरोप आहे. झाडा झुडपातील आडोशाचा आधार घेत तृतीयपंथांनी नागरिकांना लुटल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, माजिवडा भागात राहणारी एक तरुणी शनिवारी रात्री कामावरुन आपल्या घरी परतत असताना तीन-चार तृतीयपंथीयांनी तिला लुटण्याचा प्रयत्न केला. याबाबत तरुणीने कापूरबावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असता पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरं दिल्याचा या तरुणीने आरोप केला आहे. त्यानंतर तरुणीने मनसे कार्यकर्त्याकडे तक्रार केली तेव्हा मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह माजिवडा येथे जाऊन तृतीयपंथीयांना जाऊन पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही तृतीयपंथीयांनी धूम ठोकली तर एक हाती लागला असता त्याला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला.