Mumbai News : लसीकरणाला सुरुवात झाली, आता तरी सर्वांसाठी लोकल सुरु करा, मनसेची CM ठाकरेंकडे मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रासह देशभरात आजपासून शनिवार (दि. 16) कोरोना लसीकरणाला प्रारंभ झाला आहे. याचपार्श्वभूमीवर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता तरी सर्वांसाठी लोकल रेल्वे सेवा चालू करा. नोकरीसाठी मुंबईकडे धावणारा मध्यमवर्ग आपली अर्धी कमाई प्रवासावर खर्च करून व वाहतूक कोंडीत रोज रोज अडकून थकला आहे, अशी मागणी आमदार पाटील यांनी ट्विटद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे.

ऐतिहासिक लसीकरण मोहिमेला देशात आजपासून सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यासाठी शहरांसह जिल्हा आणि ग्रामपातळीवरील लसीकरण केंद्रे सज्ज झाली आहे. दोन लसींचा वापर मोहिमेत केला जाणार आहे.

महाराष्ट्रात मुंबईतील बीकेसी येथील लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. महाराष्ट्रात कोरोनाची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यातुलनेत पहिल्या टप्प्यात राज्यात 9 लाख 63 हजार लसी पुरवल्या आहेत. राज्याची परिस्थिती पाहता आणखी लसींची मागणी केली आहे. राज्यात 8 लाख जणांना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. त्यासाठी 511 केंद्रे सज्ज झाली आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वसामान्यांसाठी बंद असलेली लोकल मर्यादित घटकांसाठी सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. गेल्या 9 महिन्यांपासून लोकल बंद आहे. चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवावगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.