‘PUBG MOBILE’ गेममुळे जुळले ‘या’ दोघांचे सूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पबजी गेमचे वेड आहे. या पबजीच्या वेडापायी अनेकांवर परिणाम झाल्याच्या घटना समोर आली आहे. परीक्षेच्या काळात पबजीवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली होती. पबजीवरून देशात वादळ उठल्याचं चित्र दिसत आहे. सतत पबजी खेळल्यामुळे काश्मीरमधील एका फीटनेस ट्रेनरला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागल्याची घटनाही काही दिवसांपूर्वी समोर आली होती. इतरांना घातक ठरणारी पबजी गेम एका जोडप्यासाठी दुवा ठरली आहे. पबजी खेळता खेळता त्या दोघांचं प्रेम जुळल्याची घटना समोर आली आहे. यानंतर त्यांनी अधिक वेळ न दवडता साखरपुडाही उरकला आहे.

आजच्या सोशल मीडियाच्या जगात सोशलवर काय होईल हे काही सांगता येत नाही. काहीमध्ये वाद पेटू शकतो तर काहींची मनेही जुळू शकतात. अशीच काहीशी ही घटना समोर आली आहे. एका तुरुणाने त्याच्या ट्विटर हँडलरवरून त्याची ही लव्ह स्टोरी सांगितली आहे. @Nourhanlhashish अशा नावाने हे ट्विटर हँडलर असून नूरहान अल हशीश असं त्या तरुणाचं नाव आहे. त्याने ट्विट करत एक फोटोही शेअर केला आहे. फोटो शेअर करताना नूरहान म्हणाला की, पबजीमधून सुरुवात झाली होती आणि आता आम्ही साखरपुडाही उरकला आहे. लवकरच विवाहबंधनात अडकणार आहोत.

दरम्यान आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्यांच्या उपस्थितीत नूरहानने साखरपुडा उरकून टाकला आहे. शिवाय मजेदार बाब म्हणजे त्याने अद्याप त्याच्या जोडीदाराचे नाव मात्र गुलदस्त्यात ठेवल्याचे समजत आहे. नूरहानच्या अकाउंटवर तो मिस्र या देशाचा असावा असा अंदाज बांधला जात आहे. नूरहानचं हे ट्विट सध्या खूप व्हायरल होताना दिसत आहे.