संपूर्ण देशात लवकरच कडक निर्बंधाची (Lockdown) घोषणा?; उच्चस्तरीय बैठकीत झालं एकमत, PM मोदी घेऊ शकतात मोठा निर्णय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात आहे. परंतु देशातीली कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून या याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडत आहे. महाराष्ट्र, दिल्ली या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. तर इतर राज्यात कोरोना आपले हातपाय पसरत आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तशी तयारी केली जात असून दिल्लीत घडमोडींना वेग आला आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे हे या बैठकीला उपस्थित होते. बहुतांश आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील या बैठकीला उपस्थित होते. देशातील कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. देशात लॉकडाऊन करावा अशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे.

सध्या पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुरु आहे. राज्यात एकूण 8 टप्प्यात मतदान होणार असून 5 टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. तर तीन टप्प्यातील मतदान शिल्लक आहे. या तीन टप्प्यातील मतदान वगळून इतर संपूर्ण बंगालचा समावेश करुन देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आसाम, केरळ, तामिळनाडू, आणि पुद्दुचेरीतील मतदान पूर्ण झाले आहे. या सर्व राज्यांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होणार आहेत. मात्र, तोपर्यंत थांबल्यास देशातील परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते. त्यामुळे पश्चिम बंगालमधील काही भाग सोडून इतर भागाचा समावेश करुन देशात पुन्हा लॉकडाऊन करण्याबाबत या बैठकीत एकमत झाल्याचे सुत्रांकडून समजेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.